अण्णाभाऊ साठे जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्त्व : प्रा. शिवाजी उकरंडे

0

रत्नागिरी : अण्णा भाऊ साठे हे व्यक्तिमत्त्व फक्त भारताचे नाही तर ते जागतिक दर्जाचे झाले आहे, असे उद्गार प्रा. शिवाजी उकरंडे यांनी काढले.

रशियाची राजधानी मॉस्को येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे १४ सप्टेंबर रोजी अनावरण झाले. ही बाब समस्त भारतीयांसाठी अभिमानाची आहे. या घटनेचा आनंदोत्सव तसेच तरुण पिढीला महान अशा समाजसुधारकाच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून अनुलोम संस्थेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम मोहिनी मुरारी मयेकर वरिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रा. उकरंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला. अण्णांनी वास्तविक जीवनातील मांडलेले, साहित्य लेखनातील अनेक संदर्भ विशद केले. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले. फक्त दीड दिवस शाळेत जाणारी एक सामान्य व्यक्ती आंतरिक शक्तीच्या जोरावर कसे असामान्य कार्य करू शकतो, हे अण्णांनी जगाला दाखवून दिले. त्यांचे साहित्य, कादंबरी यांतील विचार तरुणांनी आत्मसात केल्यास निश्चितच भविष्यकाळासाठी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य गणेश कुलकर्णी यांनी केले. अनुलोम रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपविभाग प्रमुख रवींद्र भोवड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, तरुणांनी, अण्णाभाऊंनी निर्माण केलेल्या साहित्याचा अभ्यास करावा, त्यातून नवीन ऊर्जा मिळवून समाजजीवनात यशस्वी व्हावे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ.स्नेहा पालये यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केलेले व महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील साहित्य विद्यार्थ्यांनी अभ्यासावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here