रत्नागिरी : कोरोनाचा रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीजवळचे साखरतर गाव आणि अलसुरे (ता. खेड) येथील प्रतिबंधित क्षेत्रातील तीन किलोमीटरच्या परिघात आरोग्य सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. साखरतर भागातील एक हजार २०० घरांमधील पाच हजार ८२५ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. तेरा पथके आणि चार पर्यवेक्षकांच्या मदतीने सर्वेक्षण झाले. साखरतर गावाच्या प्रतिबंधित तीन किलोमीटर परिघाबाहेरच्या दोन किलोमीटरच्या बफर क्षेत्रात दोन हजार ६२४ घरे आणि १२ हजार २२८ लोकसंख्या आहे. तेथे आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने तपासणी झाली आहे. तसेच अलसुरे (ता. खेड) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मरण पावला. अलसुरे येथे कोरोनाबाधित क्षेत्रातील तीन किलोमीटर परिघात दोन हजार ९१० घरांमधील दहा हजार ८४८ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण २६ पथके आणि नऊ पर्यवेक्षकांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. तेथील बफर क्षेत्रात चार हजार ३७६ घरे आणि १६ हजार २१३ लोकसंख्या आहे. तेथेही आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने तपासणी झाली आहे.
