चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता : जयंत पाटील

0

मुंबई : भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं.

यानंतर आता चित्त्यांवरून राजकीय पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादीने यावरूनच पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. “चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता” असं म्हणत घणाघात केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून जोरदार टीका केली आहे. चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं. चित्त्यांना जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातं तसं द्यायला पाहिजे. पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. अजित पवार यांनीही यावरून निशाणा साधला आहे.

“चित्ते आले ठीक आहे पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?”

अजित पवार यांनी “बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात… महागाईचे, बेरोजगारीचे, कायदाव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे .. पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, याऐवजी वेदांताचं काय होणार ते सांगा?” असा सवाल विचारला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.

“भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना ‘चिता सरकार’ म्हणायचं का?”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भाजपा आम्हाला पेंग्विन सरकार म्हणायची, आता त्यांना ‘चिता सरकार’ म्हणायचं का?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. “राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्ही चित्ता आणलेत तर तुम्हाला चिता सरकार म्हणायचे का?” असा प्रश्न विचारला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्या केसवरूनही हल्लाबोल केला आहे. प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहे का? मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 20/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here