‘राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये’; वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात जवळपास अर्धा तास केलेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यावर सडकून टीका केली.

एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शिंदे गटाला आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी मिंधे गटाची अवस्था : उद्धव ठाकरे
मुंबई हे देशाच आर्थिक केंद्र आणि आणि तेथून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता? वेदांतावरून धादांत खोट बोलता? कुणाशी भांडताय? आम्हीं येऊ तुमच्यासोबत, आणतो म्हणा, परत आणा. मिंधे गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी टीका वेदांता प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे. मिंधे गट नुसता होय महाराजा बोलत आहे…आज दिल्लीत गेले..तिथे ठणकावून सांगितलं का, प्रकल्प का गेला? वेदांतला आता केंद्र सरकार सवलती देणार म्हणे, मग महाराष्ट्रात येणार होता तेव्हा का सवलती दिल्या नाहीत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना आवाहन
आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व कळतंय, मराठी – हिंदू सोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्या सोबत आहेत. तुमचे चेले-चपाटे इकडे जे बसले आहेत त्यांना सांगा मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा आणि त्यासोबतच विधानसभेची देखील निवडणूक लावून दाखवा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी अमित शाह ना आवाहन देतोय, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाही तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. कुस्ती आम्हांलाही येते, तीच आमची परंपरा आहे. पाहू कोण कुणाच्या पाठीला माती लावतो.

मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली : उद्धव ठाकरे
मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आलेले… आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू.

तुम्हीं प्रयत्न कराच, तुम्हांला आम्हीं आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे
आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे.

मला माझ्या घराण्याचा अभिमान : उद्धव ठाकरे
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील घडामोडी तुम्हांला माहित हव्यात. जनसंघ हा समिती फोडणारा, ही त्यांचीच औलाद आहे. पंचवीस वर्ष युतीत आमची सडली, कुजली. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. विनासायास यांना उपमहापौर पद मिळालं… मेहनत करायची शिवसैनिकांनी. वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे… तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले आहेत… वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला आहे.

व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना 15 वर्षापूर्वी पहिली मुंबईत शिवसेनेनी आणली : उद्धव ठाकरे
गटप्रमुख हे माझे वैभव आहे. मुख्यमंत्रीपद जाऊनही इतकी गर्दी येते, हे वैभव आहे. त्यामुळे शिवसेना जे बोलते ते करते आणि जे केलंय तेच तुम्हांला घरोघरी जाऊन सांगायचे आहे. शाळांमध्ये अमुलाग्र बदल केले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केल्या. व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना पहिली मुंबईत सुरू केली. आपली पंचाईत ही होते की आपण जे करतो त्याची जाहिरात करत नाही. आरोग्य क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण जितके वेगाने लक्षणीय बदल केले तितके जगातील अन्य कुठल्याही शहरात केले गेले नाहीत.

भाजपकडे भ्रष्टाचारमुक्त करण्याचे वॉशिंग मशीन
भाजपकडे कोणत वॉशिंग मशीन आहे, कोणते ब्युटी क्रीम आहे की ज्यामुळे भ्रष्टाचार जाऊन सर्व लखलखीत होतं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सवाल या वेळी उपस्थित केला. भ्रष्टाचारविरोधात बोलायला तोंड आहे का तुम्हांला? जी प्रतिमा आहे खोके सरकार, त्यातुन आधी बाहेर पडा, असे देखील उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

मूठभर निष्ठावंत सोबत असल्याचा अभिमान
ठाकरे घराणं संपवायचंय तर संपवा. माझ्या समोर बसलेला तो ठाकरे परिवार आहे. या प्रत्येकाच्या हृदयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. मी शांततेच आवाहन करतोय कारण रक्तपात झाला तर तो आपल्यात आणि या गद्दारांमध्ये होईल. कमळाबाईचे कपडे साफ राहतील. त्यांचा तो डाव मला यशस्वी होऊ द्यायचा नाही. गायीच्या आतड्याला लागलेल्या गोचीड दूध नाही तर रक्त पितात तशा या गोचीड होत्या, गळून गेल्या ते बर झालं. मूठभर निष्ठावंत सोबत असतील तरी मला चालेल.

पहिली निवडणूक म्हणून लढा, शिवसैनिकांना आवाहन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही शेवटची निवडणूक म्हणून लढा. होय ही तुमची शेवटचीच निवडणूक, परंतु तुम्ही ही आपली पहिली निवडणूक म्हणून लढा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले अस समजा की, आपल्याकडे काहीही नाही, गेलेले खासदार, आमदार गेल्या निवडणुकीत पडलेत. तिकडे आपल्याला भगवा फडकवायचाय. प्रत्येक शाखा शिवसेनेची शाखा, शिवसेना म्हणजे विश्वास, विकास, तिकडे गटप्रमुख असलेच पाहिजेत. अनेक काम आपण केली आहेत, ती पोचवायची आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here