रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांना मदतीचा हात देण्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने मंगळवारी (ता. ७) दुपारचे जेवण सर्व पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोच केले. शहर, परिसरामध्ये सुमारे १५० पोलिस कार्यरत आहेत. पोलिसांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाकडून कारवांचीवाडी, रेल्वेस्टेशन, कुवारबाव, जे. के. फाईल्स, मारुती मंदिर, जयस्तंभ, खडपेवठार, तेली आळी येथे बंदोबस्तावरील पोलिस व वाहतूक पोलिसांना जेवण दिले. या वेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक अतुल सातपुते, उपप्रबंधक रमेशचंद्र कंदी यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
