व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी रत्नागिरीतील सोनारासह दोघांना पोलीस कोठडी

0

रत्नागिरी : रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेतून अचानक गायब झालेले कीर्तीकुमार अजय राज कोठारी वय ५५ रा. भाईंदर मुंबई यांचा रत्नागिरीतील एका सोनाराने आपल्या दोन साथीदारांच्या साथीने हाताने व रस्सीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सोनार व त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


भूषण सुभाष खेडेकर (42,रा.खालची आळी,रत्नागिरी),महेश मंगलप्रसाद चौगुले (39,रा.मांडवी सदानंदवाडी,रत्नागिरी) आणि फरीद महामुद होडेकर (36,रा.भाट्ये,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. मयत कीर्तीकुमार हे सोने चांदीचे व्यापारी आहेत. ते आपला माल रत्नागिरीत विकण्यासाठी नेहमी येत असत. छोटे चांदी, सोन्याचे दागिने ते आपल्यासोबत आणत असत. ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी धनाजी नाक्यावरील एका दुकानात आपल्या मालाची ऑर्डर घेऊन ते राम आळीतील एका दुकानात चालले होते. याच दरम्यान संशयिताने त्यांना मालाची ऑर्डर व उधारीचे पैसे देण्यासाठी आपल्या दुकानात बोलावून घेतले व अन्य दोन साथीदारांच्या सहाय्याने त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली अशी माहिती मिळत आहे.

सुनियोजित पद्धतीने केली हत्या
अत्यंत सुनियोजित पद्धतीने हि हत्या केल्याचे आता तपासात समोर येत आहे. यासाठी अनेक महिने सावज हेरण्याचे काम सुरु होते. भूषण खेडेकर हा कर्जबाजारी होता. यापूर्वी देखील अनेकांची फसवणूक त्याने केल्याचे आता बोलले जात आहे. भूषण मागील काही महिन्यांपासून सावज हेरत होता. यासाठी तो रत्नागिरीत येणाऱ्या काही व्यापाऱ्यांना मेसेज देखील करीत होता व रत्नागिरीत कधी येणार याची विचारणा करीत होता. असाच मेसेज त्याने कीर्तीकुमार यांना देखील केल्याचे बोलले जात आहे.

एक मोठा व्यापारी सुदैवाने वाचला
कीर्तीकुमार यांच्या आधी आणखी एका व्यापाऱ्याला देखील भूषणने आपल्या दुकानात बोलावले होते. मात्र तो व्यापारी गेला नाही.

निर्दयतेचा कळस
कीर्तीकुमार यांचे शव आबलोली येथून जवळच असणाऱ्या एका पुलाखाली सापडले आहे. कीर्तीकुमार यांची भूषण आणि त्याच्या साथीदारांनी अत्यंत निर्दयपणे हत्या करून त्यांचा मृतदेह मच्छिमारी जाळ्यात करकचून बांधून मग तो गोणीत भरलेला आढळला आहे. अत्यंत शांत डोक्याने हत्या करून भूषण आणि त्याच्या साथीदारांनी रात्री दीडच्या सुमारास रिक्षाचा वापर करून हा मृतदेह आबलोली जवळील पुलाखाली टाकला असल्याची माहिती मिळत आहे. ज्या दिवशी भूषणने हत्या केली त्या दिवशी घरी येऊन त्याने भोजन देखील केले. एका हॉटेलमधून काही अन्नपदार्थ देखील भूषण ने मागवले होते. पोलिसांनी भूषणला ताब्यात घेईपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरील भाव अगदी सामन्य होते. अगदी पोलीस स्थानकात येईपर्यंत मला का पकडले ? मी काय केले ? असे प्रश्न तो पोलिसांना विचारत होता.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दुकान मालक भूषण खेडेकरसह या गुन्ह्यात त्याला मदत करणार्‍या अन्य दोघांना ताब्यात घेउन त्यांची चौकशी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखताच भूषणने मी महेश आणि फरीद या दोघांच्या मदतीने किर्तीकुमार कोठारी यांना आधी हातांनी आणि नंतर रस्सीने गळा दाबून ठार मारल्याचे कबुल केले. त्यानंतर संशयितांनी किर्तीकुमार यांचा मृतदेह दुकानातच गोणत्यात भरुन दुकानाबाहेर उभ्या केलेल्या रिक्षेतून अबलोली येथील जंगलमय भागात नेउन टाकल्याचे कबुल केले आहे.

मा . पोलीस अधिक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग व मा . अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई , श्री सदाशिव वाघमारे , उपविभागीय पोलीस अधिकारी , रत्नागिरी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या वेगाने तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक , श्री . विनित चौधरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले , पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले व आकाश साळुंखे , सहाय्यक पोलीस फौजदार हरचकर , पोलीस हवालदार जयवंत बगड , प्रविण बर्गे , गणेश सावंत , पोलीस नाईक वैभव शिवलकर , दिपराज पाटील , आशिष भालेकर , पंकज पडेलकर , अमोल भोसले , मनोज लिंगायत , मंदार मोहीते , प्रविण पाटील , विलास जाधव , पोलीस हवालदार चालक केतन साळवी , विशाल आलीम , सी.डी.आर. विंग विभागचे पोलीस नाईक रमिज शेख व निलेश शेलार यांनी केलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री . विनित चौधरी करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here