सरकारी प्रक्रियेला फाटा देत रूग्णांच्या सुविधेसाठी आ. सामंतानी घेतला पुढाकार

0

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे सामान्य नागरिकांसाठी महत्वाचे आहे. सध्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात विविध साथी पसरल्या असून त्यामुळे जिल्हा रूग्णालयाकडे ग्रामीण व शहरी भागातून अनेक रूग्ण धाव घेत असल्याने रूग्णालयात जागाच उपलब्ध नसल्याने रूग्ण उपचारासाठी जमिनीवर व अगदी स्वच्छतागृहाच्या जवळ गाद्या घालून उपचार करून घेत आहेत. ही बाब रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासकीय रूग्णालयाला भेट दिली. शासकीय रूग्णालयाची १०० बेड असलेली इमारत सध्या उद्घाटनाशिवाय पडून होती. सामंत यांनी रूग्णालयात येताच सर्व अधिकारी वर्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनाही बोलावून घेतले. व या इमारतीचा ताबा रूग्णालयाकडे देण्याचा आदेश दिला. त्यानंतर नवीन इमारतीत ५० रूग्णांची सोय करण्यात यावी असे त्यांनी सुचविल्यावर शासकीय रूग्णालयाच्या अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी बेडची सुविधा नसल्याचे स्पष्ट करून त्यासाठी टेंडर व अन्य गोष्टींची कार्यवाही करावी लागेल व त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल असे सरकारी पद्धतीचे उत्तर दिले. परंतु आ. सामंत यांनी तात्काळ रत्नागिरीतील या व्यवसायातील उद्योजकाशी बोलणे करून त्याला सर्व परिस्थिती सांगितली. व बेड उपलब्ध करून देण्यासाठी सांगितले. उद्योजकाचा प्रतिनिधी तातडीने रूग्णालयात आल्यावर त्याने रुग्णालयाला आवश्यक असलेले ५० बेड उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मात्र उद्योजकाच्या बेडची किंमत व शासकीय रूग्णालयाची मंजूर असलेली किंमत यात एक ते दीड हजारचा फरक पडत होता परंतु आ. सामंत यांच्यामुळे या उद्योजकाने हे बेड शासकीय दराने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. तो प्रश्‍न आता मार्गी लागल्यानंतर रूग्णालयाच्या अधिकार्‍यांनी आवश्यक असलेल्या चादरी देखील उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले. त्या देखील सामंत यांनी या उद्योजकामार्फत उपलब्ध करून दिल्या. आ. सामंत यांनी पुढाकार घेतल्याने आता चार-पाच दिवसात नव्या इमारतीत रूग्णांसाठी ५० बेड उपलब्ध होणार आहेत. यामुळे यापुढे तरी जिल्हा रूग्णालयात रूग्णांचे हाल कमी होतील असे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here