खानुतील बिबट्या पकडण्यासाठी वन विभाग अँक्शन मोडमध्ये

0

रत्नागिरी : तालुक्यातील पाली-खानू येथे गुरांना गवत काढण्यासाठी वस्तीजवळील जंगलभागात गेलेल्या प्रौढावर बिबट्याने हल्ला केला. यात जखमी झालेल्या प्रौढावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वनविभागाने तात्काळ घटनास्थळ परिसरात बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी दोन कॅमेरे लावले असून अधिकारीही लक्ष ठेवून आहेत.

HTML tutorial

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रौढाचे नाव सुरेश गंगाराम सुवारे (वय 55) असे आहे. ते गुरुवारी दुपारी वाडीजवळील रानात गवत काढण्यासाठी गेले होते. गवतामध्येच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सुवारे यांच्यावर पाठिमागून हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकाराने सुरेश सुवारे गोंधळून गेले. त्यामुळे बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केले. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाडीतील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बिबट्याने पळ काढला होता. त्यानंतर त्यांना ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुरेश सुवारे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
ग्रामस्थांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांसह वनविभागाला कळविली. रत्नागिरीचे वनाधिकारी श्री. सुतार व त्यांच्या सहकार्‍यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत सुरेश सुवारे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर खानू येत जात घटनास्थळाची पाहणी केली.

शुक्रवारी बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पाळत ठेवण्यासाठी दोन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे बिबट्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे दोन अधिकारीही या भागावर लक्ष ठेवणार आहेत. सायंकाळच्या सुमारास बिबट्या वाडी-वस्तीजवळ येऊ नये यासाठी फटाके फोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जखमी सुरेश सुवारे यांंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना शनिवारपर्यंत घरी सोडण्यात येईल. त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी वनविभागाने वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. त्यांना लवकरच मदत दिली जाईल असे रत्नागिरीचे वनाधिकारी श्री. सुतार यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:42 PM 26/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here