‘शिवतीर्था’च्या तिपटीने दसरा मेळावा घेणार : दीपक केसरकर

0

कोल्हापूर : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ज्यांनी प्रथम अर्ज केला त्यांना प्रथम परवानगी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविले असते तर हा मेळावा होऊ दिला नसता. मात्र, मुख्यमंत्री जनतेचा आहे, त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा आदर राखला आहे.

HTML tutorial

या मेळाव्याच्या तिपटीने आम्हीही दसरा मेळावा घेउ, आणि बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटू, असे शालेय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापुरात सांगितले.

कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून घोषणा होताच दीपक केसरकर यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांचे विचार पुन्हा जागृत करु असे त्यांनी सांगितले. देवीचे मनापासून पूजन करायचे असते. देव शेवटी भक्तीचा भुकेला असतो, यात राजकारण आणायचे नाही, असे सांगून आम्हीही शांततेत दसरा मेळावा घेणार आहोत आणि कोणालाही चिडविण्यासाठी हा मेळावा नसेल असे स्पष्ट केले. केसरकर म्हणाले, दसरा हा विचाराचे सोने लुटायचा दिवस असतो. जे विचार बाळासाहेब देत असत, त्या विचारांशी आम्ही प्रामाणिक आहोत. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आम्ही राहू, यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थान नसेल.

बाळासाहेबांचे विचार प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांच्यामुळेच वैष्णोदेवी आणि अमरनाथसारख्या यात्रा सुरळीत पार पडल्या. आजसुध्दा वैष्णोदेवीला ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आमच्यासोबत असलेल्या खासदारांना आहे. देवीचे आणि बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहेत. म्हणून शिवसेनेचा मूळ विचार सोबत घेउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जात आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे दीपक केसरकर म्हणाले.

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यास जाण्याचा आग्रह आमच्यासोबत असलेले कांही शिवसैनिक घेत आहेत. मात्र त्या गटाच्या मेळाव्याला जायचे की नाही, याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मुख्यमंत्र्यांनी जर ठरविले असते तर शिवतीर्थावर आमचाच मेळावा झाला असता, मात्र आम्ही न्यायालयाचा आदर केला आहे. याउलट त्यांनी काल केलेला जल्लोष पाहता कायदा व सुव्यवस्था राखून हा मेळावा घेण्याची अट धुडकावून लावलेली दिसते, असे केसरकर म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 26/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here