रत्नागिरी : जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर आवश्यक औषध साठ्यांसह वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच सर्व पुरग्रस्त भागात आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, पुराचे पाणी घर आणि दुकानात शिरले आहे. यातून साथग्रस्त आजार उद्भवण्याचा धोका आहे. याबरोबरच रेल्वे मार्गावरही पाणी साचल्याने अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. यातील प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाकडून प्रत्येक स्थानकांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.
