शासन आणि प्रशासनाने एकत्रित राहून लोककल्याणकारी कामे करणे अपेक्षित : पालकमंत्री उदय सामंत

0

अलिबाग : लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी लोकसेवेसाठी बांधील आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने एकत्रित राहून परस्पर समन्वयाने लोककल्याणकारी कामे करणे अपेक्षित आहे. या विचारधारेने सर्वांनी मिळून रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणू या, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी केले.

रायगड जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा तसेच इतर नियोजित विकासकामांबाबतची आढावा बैठक बुधवारी मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले की, अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे जलद गतीने विकासकामे पूर्ण करावीत. सर्वांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवावे. ही ध्येयपूर्ती साधताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्याही मताला महत्त्व द्यावे. अधिकाऱ्यांनीही लोकोपयोगी नावीन्यपूर्ण कामे सुचवावीत.

ते पुढे म्हणाले, टंचाईचे प्रस्ताव हे वेळेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्यक्ष टंचाई उद्भवल्यास त्यावरील आवश्यक कार्यवाही योग्य पद्धतीने करता येऊ शकेल. नगरपालिकांनी मिनी फायर ब्रिगेड व्हॅन साठी प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यात कारागृहांच्या सोयी सुविधांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी प्रक्रिया तात्काळ करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे.

शिक्षण विभागाविषयी आढावा घेताना प्राथमिक शाळांनी त्यांच्या सोयीसुविधा व अडचणींबाबतचा अहवाल सादर करावा. माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त खोल्यांची माहिती सादर करावी. यामध्ये उत्कृष्ट कामकाज, उत्कृष्ट निकाल असणाऱ्या शाळांसाठी “मॉडर्न लॅब” ची निर्मिती करण्यात येईल, असे सांगून श्री.सामंत यांनी जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असेही सूचित केले.

जिल्ह्यातील आरोग्य सोयीसुविधांचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच क्रीडा या संदर्भातील आढावा बैठक स्वतंत्रपणे आयोजित करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्याचबरोबर जिल्ह्यात कोविड-19 अंतर्गत कोणकोणत्या सोयीसुविधा निर्माण केल्या गेल्या, त्यातील सीएसआर निधीतून कोणत्या व जिल्हा वार्षिक नियोजन मधून कोणत्या याबाबतचीही सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या काळात काही ग्रामीण रुग्णालयात “मॉड्युलर ऑपरेशन थिएटर” उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच जुन्या मात्र समाधानकारक स्थितीतील रुग्णवाहिका तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करता येतील का याविषयी चाचपणी करावी. लंपी आजाराविषयी गांभीर्याने लक्ष देवून जनावरांचे आवश्यक लसीकरण तात्काळ पूर्ण करावे. सेवा पंधरवडा अंतर्गत शासनाने निर्देशित केलेल्या सेवा जास्तीत जास्त नागरिकांना द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे यांनी मंत्री महोदयांसमोर संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा सादर केला.

या बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी पालकमंत्री महोदयांना रायगड जिल्हा प्रशासनाची “परिवर्तन” ही कार्यपुस्तिका भेट म्हणून दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 29/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here