एमपीएससीकडून परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा

0

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले.

२०२३ पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. एमपीएससीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपाची परीक्षा पद्धत बंद करून वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब २०२३ पासून करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. मात्र नवी पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर २०२३ च्या परीक्षांचे वेळापत्रक एमपीएससीने जाहीर केले. या वेळापत्रकात दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२३, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा २०२३ अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, आदी पदांचा समावेश आहे; तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित २०२३ अंतर्गत राज्यसेवेत ३३ संवर्गातील पदांमध्ये वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक, आदी पदांचा समावेश आहे.

आयोगाने आगाऊ वेळापत्रक दिल्याने उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. पण शासनाने वेळेत मागणी पत्रक आयोगाला पाठविले तर दिलेल्या तारखेला परीक्षा होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, असे मत स्टुडन्ट्स राइट्स असोसिएशनच्या महेश बडे यांनी व्यक्त केले.

संभाव्य तारखा
राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर २०२३ या ४ दिवशी होणार आहेत. तसेच या परीक्षांचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागणार असून, याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहिरात निघणार असून, ३० एप्रिल रोजी परीक्षा होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 29/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here