रत्नागिरी : उशीरा दाखल झालेल्या मोसमी पावसाने ऑगस्ट महिन्यात दमदार सातत्य दाखविल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम आणि ६४ लघुपाटबंधारे प्रकल्पात ८७.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत पाच टक्क्याने वधारला आहे. यापैकी ५० धरणे १०० टक्के भरली आहेत. तर १५ धरणे नव्वदीत आहेत. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने सरासरी ३१४९ मि.मी. ची मजल मारली असून गतवर्षापेक्षा पावसाने जोरदार आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात समाधानकारक सिंचन झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ६७धरणांपैकी मंडणगड तालुक्यात ३, दापोलीत ५, खेडमध्ये ४, गुहागर तालुक्यात २, चिपळूण तालुक्यात ९ संगमेश्वरमध्ये ६,रत्नागिरीमध्ये १,लांजा तालुक्यात ११ आणि राजापूर तालुक्यात ९ धरणामध्ये १०० टक्के भरली आहेत. जिल्ह्यात दमदार पावसाने सातत्य राखल्याने १५ धरणे ९० टक्के भरली असून काही धरणातून पाणी विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र कोणताही धोका यात नाही. धरणांची मजबूती अजूनही भक्कम असून या धरणांचा पाणीसाठा मुबलक झालेला आहे. त्यामुळे परिसरातील जलस्रोतही प्रवाहीत झाले आहेत.
