भारताच्या 2 बोटी पाकिस्तानच्या ताब्यात; बोटींवरील 16 खलाशांना अटक, 7 जण पालघर जिल्ह्यातील, खलाशांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू

0

पालघर : गुजरात राज्यातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन बोटींना पाकिस्तानच्या मेरिट टाईम सिक्युरिटी एजन्सीने ताब्यात घेतले असून त्यातील अटक केलेल्या एकूण १६ खलाशी कामगारापैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यांनी दिली.

HTML tutorial

गुजरात राज्यातील ओखा येथील मत्स्यगंधा व अन्य एक मच्छीमार बोट २३ सप्टेंबर रोजी आपल्या बंदरातून मासेमारी साठी नेहमी प्रमाणे समुद्रात गेल्या होत्या. या दोन्ही बोटी मत्स्यसाठ्यांचा शोध घेत असताना समुद्रात प्रवाहात सोडलेली जाळी आपल्या बोटीत घेत असताना अचानक पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या स्पीड बोटींनी भारतीय मच्छीमार बोटींना घेराव घातला आणि त्या दोन्ही बोटीसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले. या दोन्ही बोटीत असलेल्या खलाशांपैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असून अन्य ९ खलाशी हे गुजरात राज्यातील आहेत.

मागील अनेक वर्षापासून पाकिस्तान सरकारने कारवाई करीत पकडलेल्या १२०० बोटी ताब्यात असून आजही सुमारे ६०० मच्छीमार त्याच्या ताब्यात आहेत. यापैकी सुमारे २६८ मच्छीमारांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांना पाकिस्तान सरकारने सोडलेले नसल्याचे जतिन देसाई यांनी सांगितले आहे. भारत सरकारने त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नसल्याने आजही निष्पाप खलाशी कामगार कारागृहात खितपत पडले आहेत.

गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे(वय 32 वर्ष) या मच्छीमार तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. समुद्रात हद्दीचे कुठलेही मार्किंग केलेले नसताना चुकून मासेमारी करताना भारत-पाकिस्तान हद्द ओलांडल्यावर सरळ गोळीबार करण्याच्या प्रकरणाचा त्यावेळी देखील इंडिया-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी या संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यानी निषेध नोंदवला होता.

पाकिस्तान सरकारने पकडलेल्या जिल्ह्यातील खालशांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करीत केंद्र सरकारवर दबाव टाकला पाहिजेत अशी मागणी त्या खलाशांचे कुटुंबीय करीत आहेत. दोन्ही देशाने आपापसात समझोता करून एकमेकांच्या हद्दीत आलेल्या मच्छीमार बोटी व त्यातील खलाशांना सक्त सूचना देऊन परत आपल्या भागात जाण्यास भाग पाडले गेले पाहिजे, असे मत जतीन देसाई यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 01/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here