6 राज्यांच्या 7 विधानसभेच्या जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक; तर 6 नोव्हेंबरला निकाल

0

नवी दिल्ली : देशातील सात विधानसभा पोटनिवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्व निवडणुकांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगाना आणि ओदिशा मधील सात विधानसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच, या निवडणुकांचा निकाल सहा नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सोमवारी देशातील सात पोटनिवडणुकांबाबत मोठी घोषणा केली.

या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 14 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतो.

ज्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ, हरियाणातील आदमपूर, बिहारमधील मोकाम आणि गोपाळगंज, महाराष्ट्रातील अंधेरी इस्ट, तेलंगाणातील मुनुगोडे आणि ओदिशातील धामनगर मधील जागेचा समावेश आहे.

या जागांवर पोटनिवडणूक

उत्तर प्रदेशातील गोळा गोकर्णनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार अरविंद गिरी यांच्या निधनानं रिक्त झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. अरविंद गिरी हे तीन वेळा समाजवादी पक्षाचे आमदारही राहिले होते. भाजपमध्ये येताना ते दोनदा विधानसभेत पोहोचले होते.

कुलदीप बिश्नोई यांनी हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून राजीनामा दिला होता. काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले, त्यानंतर ही जागा रिक्त झाली. आरजेडीचे अनंत सिंह हे बिहारमधील मोकामा मतदारसंघातून आमदार होते पण एके-47 बाळगल्याच्या आरोपावरून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

सुभाष सिंह बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघातून आमदार होते. त्यांना राज्यातील एनडीए सरकारमध्ये मंत्रीही करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक होत आहे.

महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणूक

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक होत आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं नेमकं काय होणार? याचं उत्तर मिळण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. कारण एकीकडे चिन्हाची लढाई सुरु असतानाच निवडणूक आयोगानं आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरतानाच ठाकरे गटाकडे धनुष्यबाण राहणार की, त्यांना धनुष्यबाण गमवावं लागणार याचं उत्तर मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 03/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here