मुंडे महाविद्यालयात स्त्री शक्तीचा जागर कार्यक्रम

0

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवरात्रोत्सवानिमित्ताने स्त्री शक्तीचा जागर हा कार्यक्रम केला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर, अध्यक्ष विजय पोटफोडे, प्राचार्य डॉ. राहूल जाधव, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. सगिता घाडगे, खेड शाखा कार्याध्यक्ष सचिन शिर्के, मंडणगड शाखा कार्याध्यक्ष प्रा. अरुण ढंग तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री. गोवळकर म्हणाले, स्त्रियांवर पूर्वीपासून कळत नकळत रूढी-परंपरा लादण्यात आल्या. त्याला महिला बळी पडतात. स्त्री ही अंधश्रद्धेची शोषित आणि वाहक आहे. ती जर अंधश्रद्धेतून बाहेर आली, तर एक पूर्ण कुटुंबही बाहेर येते. समाजातील विधवा प्रथा या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. विधवा स्त्रीला कुठल्याही हळदीकुंकू समारंभात बोलावले जात नाही. घरातील कोणतेही शुभकार्य तिच्या हातून केले जात नाही. ज्या मुलीला नऊ महिने पोटात वाढवले, तिच्या कन्यादानाचा अधिकारही तिला दिला जात नाही. म्हणजेच स्त्रीला सर्व बाजूने गौणत्व दिल जाते. स्त्रियांमध्ये मासिक पाळीबद्दल खूप अंधश्रद्धा आहेत. वास्तविक मासिक पाळी हा विटाळ नसून एक नैसगिक क्रिया आहे. या काळात स्त्रियांना समजून घेऊन सहकार्याची भावना रुजवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले की, समाजव्यवस्थेने स्त्रीला देवीचे, मातेचे स्थान बहाल केले. तिचा गौरव केला. पण प्रत्यक्षात तिच्या वाट्याला खूप दुःख आणि यातना आल्या आहेत. व्रतवैकल्ये, कर्मकांडे, रूढी, परंपरा या शोषणावर उभारलेल्या असतात. अंधश्रद्धा हीच मुळातच शोषणाची व्यवस्था आहे. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, व्रतवैकल्ये यापासून महिलांचे आणि समाजाचे प्रबोधन करावे.

श्री. पोटफोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सगिता घाडगे यांनी केले, तर डॉ. अशोक साळुंखे यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 05/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here