‘आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे’ : पंकजा मुंडे

0

बीड : आज विजयादशमी/दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज दसरा मेळाव्यांची धूम पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगावात सुरू असलेल्या मेळाव्याची जोरदार चर्चा आहे. पंकजा मुंडेचें भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक जमले आहेत.

‘हा चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा’
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना कधी संघर्ष चुकला नाही, मलाही चुकणार नाही, असे म्हटले. पंकजा म्हणतात की, ‘मेळावा म्हटलं की, टीका होते, चिखलफेक होते. पण आमच्या मेळाव्यात काय होईल, हे सर्वांनाच माहित आहे. आमचा हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘मी कोणावर टीका करणार नाही’
त्या पुढे म्हणतात की, ‘मी कुणाविषयी काय बोलणार…मी माझ्या आयुष्यात, मुंडे साहेबांचे विरोधक किंवा माझे विरोधक, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांनाही कधीच काही बोलले नाही. मी कधीच संधीचा फायदा घेत, टीकाकारांना प्रत्युत्तर दिले नाही. मी कधीच कोणाविषयी वाईट किवा खालच्या पातळीवरचे भाष्य केले नाही, ते आमच्या रक्तातच नाही,’ असं पंकजा म्हणाल्या. तसेच, ‘हकीकत को तलाश करना पडता है, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती है |’ हा शेरही त्यांनी यावेळी ऐकवला.

‘माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण’
दरम्यान, मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘माझा मेळावा हा गरिबांचा, वंचिताचा, गावकडचा साधारण मेळावा आहे. आमचा मेळावा डोंगरात होतो, डोक्यावर ऊन असतं, तरीही लोकांचा उत्साह असतो. इथे ना खुर्च्या लागतात, ना खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी लागते. लोकं आपल्या घरातूनच भाकरी बांधून आणतात. माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा आहे. माझ्यासाठी ही वेगळीच ताकद आहे, मला मोठा आशीर्वाद आहे,’ असे पंकजा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 05/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here