रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील स्कायवॉकच्या छपराचा काही भाग तुटला असून, ते स्कायवॉकवरच पडले आहे. यामुळे दीड वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या या स्कायवॉकच्या कामाबद्दल शंका उपस्थित होत आहे. काही वर्षांपूर्वी माळनाका येथे एका अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. या भागात पेट्रोलपंप, शाळा तसेच एस.टी. डेपो असल्याने कायम गर्दी व वाहनांची वर्दळही मोठी असते. त्यामुळे विद्यार्थी वपादचारीयांनारस्ताओलांडणे कठीण होते. सकाळी व सायंकाळी याठिकाणी असलेल्या बसथांब्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळेही अपघातांची शक्यता असल्यानेच येथे स्कायवॉक असावा, अशी कल्पना पुढे आली. त्यातूनच माळनाका येथील एस. टी. डेपो ते वायंगणकर रेस्टॉरंटसमोरील जागेपर्यंत हा स्कायवॅाक प्रकल्प आहे. दीड वर्षापूर्वी याचे उद्घाटन होऊन हा पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला. यावरून विद्यार्थी, नागरिक आणि वृद्धांना रस्ता क्रॉस करणे सुलभ झाले. मात्र, याचे छप्पर तुटल्याने याच्या कामाबाबत शंका उपस्थित होत आहे. दुसऱ्या वर्षीच्या पावसातच याचे छप्पर तुटले. यामुळे खालून जाणाऱ्या वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची खबरदारी घ्यावयास हवी.
