शिंदे की ठाकरे? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी? पोलिसांनी सांगितली आकडेवारी

0

मुंबई : शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे एक लाख 25 हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे 65 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास 65 हजार जण उपस्थित

मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जवळपास 65 हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता सुमारे 50 हजार असून पोलिसांच्या अंदाजानुसार, बरेच लोक मैदानात होते आणि काही लोक मैदानाबाहेरही उभे होते. त्यामुळे जवळपास 65 हजार लोकांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावल्याचं पोलिसांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शिंदेंच्या मेळाव्यासाठी जवळपास 1 लाख 25 हजार जण उपस्थित
शिवसेनेतील बंडाचं लोण यंदा दसरा मेळाव्यापर्यंत पोहोचलं होतं. यंदा शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळाले. एक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा शिंदे गटाचा. शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानावर पार पडला. या मेळाव्यासाठी जवळपास 1 लाख 25 हजार लोक उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मैदानात सभा घेतली होती, त्यावेळी जवळपास 97 हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. पण मोदींच्या सभेपेक्षाही शिंदेच्या मेळाव्याला जास्त गर्दी असल्याचं पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

पोलिसांनी दिलेली आकडेवारी ही अंदाजे दिली असून त्यामध्ये तफावत असू शकते. शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदान दोन्ही मैदानं दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लोकांमुळे पूर्ण क्षणतेनं भरली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 06/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here