चिपळूण : तालुक्यातील दहा गावांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये 100 घरांचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बोरगाव-चिवेली परिसरात 184 शेतकऱ्यांच्या 68 हेक्टवरील शेतीचेही नुकसान झाले आहे. कोरोनामुळे हलाखीत असलेल्या ग्रामस्थांना अवकाळी पावसाने आणखी संकटात टाकले आहे. वेगवान वाऱ्याने अनेकांच्या घरातील पत्रे उडून गेले. यामध्ये तालुक्यातील बोरगाव, बामणोली, करंबवणे, तळवडे, कोळकेवाडी, भिले, कालुस्ते बु, चिवेली, खडपोली, कळकवणे या गावातील घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्यानुसार तालुक्यात सुमारे 8 लाखाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
