टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी; ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात ‘मनसे’ची उडी

0

अभिनेता प्रभास आणि सैफ अली खानच्या बहुप्रतिक्षित “आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून तो चित्रपट वादात अडकला आहे. चित्रपटातील व्यक्तीरेखांचा लुक पाहून गदारोळ माजला आहे.

यावर आता राजकीय व्यक्तींनीसुद्धा आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही आदिपुरुष प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. यानंतर चित्रपटाच्या वादात आता मनसेने उडी घेतली आहे.

मनसेने ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. आदिपुरुष टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी असल्याचं देखील म्हटलं आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरू आहे” असं म्हटलं आहे.

“आदिपुरुष टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी”

“ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे” असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

“आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”

आमदार राम कदम यांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. आदिपुरुष या चित्रपटात पुन्हा एकदा, चित्रपट निर्मात्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी देवी-देवतांचा अपमान केला आहे. आमच्या देवी-देवतांचा अपमान करत या लोकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची असं म्हटलं आहे.

राम कदम यांच्या आधी मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प्रभासच्या सिनेमातील हनुमानाच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. हनुमानाच्या अंगवस्त्रावरून त्यांनी निषेध केला आहे. त्यांचा दावा आहे की, या सिनेमात हनुमानाला जे अंगवस्त्र परिधान करून दाखवण्यात आले आहे ते चामड्याचे आहे. सिनेमा निर्मात्यांनी ही दृश्य काढून टाकावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 07/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here