मुंबई उच्च न्यायालयाला लाभणार सहा नवे न्यायमूर्ती; हायकोर्टातील न्यायमूर्तींची संख्या 67 होणार

0

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाला सहा नवे न्यायमूर्ती लाभणार आहेत. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून न्यायमूर्तीपदावरील नव्या नियुक्तींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

संजय आनंदराव देशमुख, यंशिवराज गोपीचंद खोब्रागडे, महेंद्र वाधुमल चांदवानी, अभय सोपनराव वाघवसे, रवींद्र मधुसुदन जोशी आणि वृषाली विजय जोशी यांची हायकोर्टात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता 61 वरून 67 होणार होणार आहे. एकंदरीत न्यायालयीन कामकाजाचा ताण कमी होऊन प्रकरणं लवकरात लवकर निकाली लागण्याच्या दृष्टीनं मदत होणार आहे.

उच्च न्यायालयात सध्या 61 न्यायाधीश आहेत. त्यातील 43 स्थायी न्यायाधीश आणि 18 अतिरिक्त न्यायाधीश आहेत. ही न्यायाधीशांची संख्या अलाहाबाद उच्च न्यायालयानंतर देशातील दुसर्‍या क्रमांकाची आहे. इथं न्यायालयाची मंजूर संख्या 94 आहे. आता या सहा न्यायमूर्तींनी न्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर उच्च न्यायालयाचे एकूण संख्याबळ 67 होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून संतोष चपळगावकर आणि मिलिंद साठ्ये या दोन वकिलांच्या नावांची शिफारस केली होती, परंतु केंद्र सरकारने त्यांची नावे अद्याप स्पष्ट केलेली नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारसही केली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली होती. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि प्रसन्न वराळे यांच्या या नियुक्त्या केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर आणि त्यासाठी अधिसूचना जारी केल्यानंतर होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:26 PM 07/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here