रत्नागिरी : केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने २० एप्रिलपासून उद्योगधंदे, प्रकल्प तसेच व्यवसायांबाबतीत लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सामाजिक अंतर राखून हे व्यवसाय सुरु करण्यात येणार आहेत. यानुसार प्रवासी वाहतुकीमध्ये बस आणि खासगी वाहतूक, रिक्षा वाहतूक यांची बंदी कायम असून धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बंद ठेवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये विमान, रेल्वे, बस आणि खासगी बसवाहतूक, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, टॅक्सी, रिक्षा, मॉल, जिम्नॅशियम, व्यायामशाळा, सर्व प्रकारची धार्मिक स्थळे यांचा समावेश आहे. आरोग्य सुविधा, दवाखाने, केमिस्ट, फार्मसी, मेडिकल लॅब, पशुवैद्यकीय सेवा, पशू लसीकरण, औषधी वाहतूक, बायो मेडिकल वेस्ट निचरा, पशुवैद्यकीय व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना फिरण्याची परवानगी असेल. कृषी अंतर्गत शिथिल बाबींमध्ये कृषी उत्पादन व वाहतूक, आंबा, काजू, नारळ-सुपारी लागवड यांना परवानगी असेल. कृषी अवजारे, बियाणे, औषधे, किटकनाशके, खतांची दुकाने, कृषी उत्पादन वितरण आणि त्याची विक्री सुरू राहील. मत्स्य व्यवसाय विभागामध्ये मत्स्य व्यवसाय व त्या संबंधीचे कोल्ड स्टोअरेज, वाहतूक, पॅकेजिंग आणि विक्री, माशांची डोक्यावर पाटीतून होणारी विक्री सुरू करण्यात येणार आहे. ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग कामे सुरू होतील. मनरेगा अंतर्गत इतर प्रस्तावित कामे करता येतील. दुग्ध व्यवसाय व इतर दूध उत्पादन,संकलन आणि विक्री सुरू राहील. दूध संकलन केंद्रे सुरू राहतील. दुधाची वाहतूकही सुरू राहील. पोल्ट्री, पशुखाद्य त्याचा कच्चा माल सुरु असेल. आर्थिक क्षेत्रातील सर्व बँका व वित्तीय संस्था, सर्व विमा कंपन्या, सहकारी बँक आणि पतसंस्था सुरु राहतील. सामाजिक घटकामध्ये बाल निरीक्षण गृहे, आसरा केंद्रे, वृध्दाश्रम यांचे कामकाज सुरु राहील. बांधकाम स्तरातील रस्ते पूल आणि पाटबंधारे प्रकल्प बांधकाम सुरु होणार आहेत.वाहतूक क्षेत्रातील सर्व प्रकारच्या माल वाहतुकीस परवानगी देण्यात येईल. मात्र, वाहनात केवळ २ चालक, १ क्लिनर असणे गरजेचे. महाम र्गावरील गॅरेज सुरु ठेवता येतील. केवळ माल वाहतूकदार व्यक्तींना भोजन देण्याच्या अटीवर तहसीलदार ढाब्यांना परवानगी देतील. रिकाम्या ट्रकच्या परतीच्या वाहतुकीस लॉकडाऊन काळात परवानगी आहे. याचबरोबर नव्या आदेशानुसार मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे सुरु राहतील. नगर पालिकांनी शहरांमधील खोदलेले रस्ते व खड्डे बुजवून घ्यायचे आहेत. पूर संरक्षण भिंत उभारणी कामे करता येतील. ज्या ठिकाणी टँकरची मागणी आहे तेथील व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे टँकर सुरु करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांना असतील. उद्योग क्षेत्रातील उद्योगांमध्ये ग्रामीण भागातील लघु व मध्यम उद्योग सुरु करता येणार आहेत. इतर उद्योगांनी कामगांराची वाहतूक कमी प्रमाणात करण्याच्या अटीवर तसेच कारखाना परिसरातच कामगारांची व्यवस्था केली तर त्यांना उद्योग सुरु करण्याची परवानगी देता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अर्थातच अटी-शर्थीच्या आधारे लॉक डाऊन शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:41 AM 20-Apr-20
