गॅस, दुध, पेट्रोल पर्यायी मार्गाने मागविणार

0

रत्नागिरी : जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर कार्यरत आहे. कोल्हापुरात पूरजन्यस्थिती निर्माण झाल्याने पेट्रोलचा ‘फिलिंग पॉईंट’ बदलून वाशी येथे करण्यात आले आहे. मुंबईहून दूध उपलब्ध होते का याबाबत पर्यायांचा विचार केला जात आहे. तर कोल्हापूरहून येणाऱ्या भाजीपाल्यासाठी आंबा घाटात संरक्षणामध्ये एक मार्ग सुरू करण्यात येत आहे. गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने घाबरून जाऊ नवे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. कोल्हापूर येथे पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने तसेच आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्याने रत्नागिरी आणि कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरून जिल्ह्यामध्ये दुधासह डिझेलपेट्रोलच्या गाड्या येत असतात. भाजीपाला, अंडी सारख्या गोष्टींसाठी जिल्हा कोल्हापूरवर अवलंबून आहे. मात्र हा संपर्क तुटल्याने जिल्ह्यात पेट्रोल, दूधासह भाजीपाला व अन्य तत्सम गोष्टींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी संध्याकाळपासून जिल्ह्यात दुधाच टंचाई जाणवू लागली होती. तर बुधवारी सकाळी अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या होत्या. भाजीसह अनेक गोष्टी जिल्ह्यात आलेल्याच नाहीत. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू चढया दराने विकल्या जात होत्या. मात्र जिल्ह्यात टंचाई निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. त्यामध्ये जिल्ह्यात इंधन टंचाई जाणवू नये यासाठी इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी आणि डिलर यांची बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यात येणार पेट्रोल, डिझेल हे भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलच्या इंधनाचे डेपो मिरजेहन तर हिंदुस्थान पेट्रोलियमचे इंधन हजारवाडी, बिवलडी मिरज येथील डेपोवरून येते. मात्र हे डेपो सध्या पाण्यात असल्याने जिल्ह्यात पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की डिझेलपेक्षा पेट्रोलची गरज सध्या जास्त आहे. यासाठी इंधनाचा ‘फिलिंग पॉईट’ वाशी येथे करण्यात येत असून ट्रान्स्पोर्टमार्गे ते मागविले जाणार आहे. जिल्ह्याला दर दिवसाला ३५ ते ४० हजार लिटर पेट्रोलची आवश्यकता असते असेही त्यांनी सांगितले. तर सध्या पेट्रोलचा साठा, शासकीय १५ टक्के साठा असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दूधाबाबतही मुंबईहून येणाऱ्या दुधाचा पर्याय तपासून पाहण्यात येणार आहे. जोपर्यंत कोल्हापूर येथील स्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हे अन्य पर्याय आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत. तर गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असला तरीही त्याबाबतही योग्य मार्ग काढण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here