रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येत्या २३ एप्रिलपासून हापूस आंब्याची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.
सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, कृषी पणन मंडळ आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या संयुक्त सभेत याबाबतचा निर्णय झाला. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सभेत सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले आहे. बाजार समितीने सूचित केले आहे की, आंब्याचीच प्रत आणि गुणवत्ता चांगली असावी. फळाचे वजन १८० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. आंबा डागविरहित असावा. या आंब्याची खरेदी-विक्री येत्या २३ एप्रिलपासून दररोज दुपारी तीन वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये होणार आहे. अधिक माहितीसाठी am_ratnagiri@msamb.com या ई-मेल वर अथवा किरण महाजन (९४२२६३६८३०)किंवा संजय आयरे (७३८७६०६५६५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
