चिपळूण : तालुक्यातील वाघिवरे येथील झावरी नदीच्या पात्रात रुमानी बंदराजवळ अंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. उमेर यासीन मुकादम (१७) व दाऊद अब्दुल साबळे (१५) दोघेही रा.वाघिवरे मोहल्ला हे दोघे जण नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अशातच पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा दोघेही मृत झाले होते. या घटनेबाबत वाघिवरेचे पोलीस पाटील अनिल अनंत जाधव यांनी पोलीस स्थानकात खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक लालजी यादव हे करीत आहेत.
