ठाकरे, शिंदे गटाला कोणतं नव चिन्ह आणि नाव? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

0

मुंबई : महाराष्ट्रात जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.

तेव्हापासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळत आहेत. बंडानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना दोन गटात विभागली गेली. आता त्याच शिवसेनेच्या चिन्हावरून गदारोळ सुरू आहे.

निवडणूक आयोगानं पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. तसेच, दोन्ही गटांना आता पक्षाचं नावही वापरता येणार नाही. दोन्ही गटांना वेगवेगळी निवडणूक चिन्हं निवडावी लागणार आहेत.

शिंदे गटाचे तीन पर्याय कोणते?
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला आज दुपारी 1 वाजेपर्यंत चिन्ह आणि नावांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हाचे पर्याय दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच शिंदे गटाकडून तुतारी या चिन्हाला प्राधान्य असल्याची चर्चा आहे. तसंच पक्षाच्या नावात शिंदे गट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा उल्लेख ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहितील दिलेली नाही. वर्षा बंगल्यावर काल रात्री झालेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय. आज दुपारी 1 वाजेपर्यंत शिंदे गट आयोगाकडे कोणती चिन्हं आणि नावांचा पर्याय देणार याकडं लक्ष लागलं आहे.

ठाकरेंचं तीन पर्याय कोणते?
ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं नाव काय आणि या पक्षाचं निवडणूक चिन्हं कोणतं? याचा फैसला आज निवडणूक आयोग करणार आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन आयोगाला सूचवण्यात आली आहेत. तर त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशी तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय देण्यात आलेत. निवडणूक आयोग यातल्या कोणत्या पर्यायांवर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता आहे. 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या, आणि नंतर राज्याच्या राजकारणात अविभाज्य भाग बनलेल्या शिवसेनेत सर्वात मोठ्या बंडानंतर प्रथमच नाव आणि चिन्हासाठी संघर्ष करण्याची वेळ आलीय. त्यामुळे या संघर्षात ठाकरेंच्या शिवसेनेला कोणतं नाव आणि चिन्ह मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना सोमवारी 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत त्यांच्या पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह सुचवण्यास सांगितलं आहे.

40 डोक्यांच्या रावणानं चिन्ह गोठवलं : उद्धव ठाकरे
40 डोक्यांच्या रावणानं प्रभू रामाचं शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं, जी शिवसेना तुमची आई आहे, तिच्या काळजात कट्यार घुसवली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. काल (रविवारी) उद्धव ठाकरेंनी सोशलल मीडियावरुन जनतेला शिवसैनिकांना संबोधित केलं. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र डागलं होतं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 10/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here