राजापूर : राजापूर शहर बाजारपेठ परिसरात रविवारी सकाळी आठच्या सुमारास राजरोसपणे गावठी दारू विक्री करणाऱ्या तीन संशयितांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील काही जागरूक व्यापाऱ्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या तिघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेत कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिझवान फकिरमियाँ कुडाळकर (३४, झरी रोड खालचावाडा, राजापूर), राजेंद्र अंबादास पाटील (४१, वरचीपेठ राजापूर), नितीन सुभाष पवार (२७, मधीलवाडा, राजापूर) हे तिघे संशयित रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राजापूर बाजारपेठ ठाकूरद्वार रोड खरेदी-विक्री संघाच्या पुढील चहाच्या टपरीजवळ बसून गावठी दारूची विक्री करत होते. पोलिसांनी छापा टाकून तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडील पाच लिटरच्या रिकाम्या कनसह ८० रूपयांची गावठी दारू जप्त केली. पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मौळे व पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी या तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
