रत्नागिरी : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या सचिवांपासून ते शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करुन घ्यावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा दर्शवत रत्नागिरीतही कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या गेटसमोर बधवारी साखळी उपोषण केले. बाजार समितीत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी कृती समिती आणि मराठा ठोक मोर्चा यांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे २९ जुलैपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरु होऊन दहा दिवस झाले असून, याबाबत शासनाने अद्यापर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. सरकारने भाज्या, फळे व अन्य पिके नियमनमुक्त केली आहेत. केवळ मार्केटयार्डात येणाऱ्या मालावरच सेस आकारता येतो. त्यामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न घटले आहे. बाजार समितीला सरकारने अनुदान द्यावे किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.त्याला पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक दिवस साखळी उपोषण केले. या उपोषणात सचिव किरण महाजन, सहसचिव सुहास साळवी, लेखापाल दिगंबर शिंदे, मुख्य लिपिक अभय काकतकर आदींसह २७ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
