रत्नागिरीतून दहा टन मासळी परराज्याकडे रवाना

0

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात थांबलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. रत्नागिरीतून पहिल्याच दिवशी सुमारे आठ ते दहा टन मासळी गोवा, केरळसह कर्नाटककडे रवाना झाली आहे. बांगडा, गेदर आणि काप यासारखी मासळी मच्छीमारांना मिळत असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. मिरकरवाडा येथील बंदरामध्ये सुमारे चारशेहून अधिक मच्छीमारी नौका आहेत. केंद्र शासनाने मत्स्य प्रक्रिया उद्योग सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यातील महत्त्वाची बंदरांवरील कामकाज सुरू झाले. शुक्रवारी रात्री गेलेल्या मच्छीमारी नौका रविवारी (ता. 19) किनार्‍याकडे परतल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंदरातील गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मासळी उतरवण्यासाठी दोन जेट्यांचा वापर केला जातो. मत्स्य विभागाने एकावेळी दोन ते चार नौकाच आतमध्ये आणण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार रविवारी सुमारे 15 मच्छीमारी नौकांवरील मासळी रात्री उतरवण्यात अली. एका नौकेला साधारण पाच ते दहा टप मासळी मिळाली होती. त्यामध्ये बांगडा, गेदर, काप या माशांचा समावेश आहे. बांगड्याला एका टपाला (32 किलोचा एक टप) पाच ते साडेसात हजार रुपये दर मिळत आहे. गेदर या माशाला एक हजार रुपये टप एवढा दर मिळत आहे. एका दिवसात सर्वसाधारणपणे सुमारे 8 ते 10 टन मासळीची उलाढाल झाली होती. हे मासे खाण्यासाठी स्थानिक बाजारांसह गोवा, कर्नाटक आणि केरळला पाठविण्यात आले आहेत. तब्बल एक महिन्यांनी परराज्यात मिरकरवाडा बंदरातून मासळी रवाना झाली. त्यामुळे गेले काही दिवस थंडावलेला मच्छीमारी व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाला आहे. परराज्यात माशांची वाहतूक करण्यासाठी इन्सुलेटर गाडी अत्यावश्यक करण्यात आली आहे. रविवारी मासळीच्या सुमारे पाच ते सात गाड्या रवाना झाल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंदरांवर विशेष काळजी घेतली जात आहे. बंदरात आलेली मच्छीमारी नौकेवरील मासे उतरवण्यासाठी किमान अडीच तासाचा कालावधी लागतो. मासे उतरवल्यानंतर बंदरातवर पाणी, इंधन आणि बर्फ हे उपलब्ध करून ठेवण्यात येते. मासळी उतरवली की नौकांवर हे साहित्य भरुन पाठवले जाते. त्यानंतर दुसर्‍या नौका जेटीवर आणल्या जातात. तोपर्यंत त्या सर्व नौका बंदरापासून काही अंतरावर समुद्रात उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here