मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी; ७३ टक्के चौपदरीकरण पूर्ण

0

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली बारा वर्ष रडतखडत सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने सद्यःस्थितीत महामार्गाचे काम ७३.५४ टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

३५५ कि. मी. पैकी २४७ कि.मी. चे काम पूर्ण झाले असून आता १६०.५२ कि.मी.चे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असे न्यायालयात सांगितले आहे. मात्र, पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात असताना त्याला मनाई आदेश दिल्लीत होतो. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने विशिष्ट टप्प्यातील स्थगिती उठवली कशी जाईल यासाठी प्रयत्न करावा, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाला सुनावले आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेली दोन वर्षे या याचिकेवर सुनावणी होत असून वेळोवेळी उच्च न्यायालय राष्ट्रीय महामार्ग विभाग व महाराष्ट्र शासन यांच्यावर ताशेरे ओढत आहे. तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास जात नाही. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई उच्च न्यायालयाला ७३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे, असे सांगितले. या चौपदरीकरणासाठी आत्तापर्यंत ३ हजार ३१५ कोटी रुपये खर्च केले आहेत, असेही या आकडेवारीत समोर आले आहे.

चौपदरीकरण अंतर्गत केलेल्या दहा टप्प्यातील काम प्रगतीपथावर असून इंदापूर ते वडपाळे या २६ कि.मी. पैकी १४ कि.मी.चे काम पूर्ण झाले असून ६१ टक्के काम झाले आहे. वडपाळे ते भोगाव खुर्द या ३८ कि.मी.पैकी केवळ ५ कि.मी. चेकाम बाकी आहे. नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. भोगाव खुर्द ते कशेडी या सुमारे ९ कि.मी.पैकी तब्बल ८० टक्के काम अपूर्ण आहे तर १.८४ कि.मी.चा कशेडी बोगद्याचे काम पूर्णावस्थेकडे गेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी ते परशुराम या ४२ कि.मी. पैकी अवघे दीड कि.मी.चे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या भागात ९५.२० टक्के काम पूर्ण झाले आहे. परशुराम घाट ते आरवली या ३४ कि.मी. पैकी ८.३५ कि.मी.चे काम अपूर्ण असून ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. आरवली ते कांटे या ३९ कि.मी. पैकी अवघे आठ कि.मी.चे काम पूर्ण झाले असून फक्त २२.८ टक्के काम पूर्ण झाले आहे. काटे ते वाकेड या ४९ कि.मी. पैकी अवघ्या ७कि.मी.चे काम पूर्ण झाले असून फक्त २४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

वाकेड ते तळेगाव (जि. सिंधुदुर्ग) या ३३ कि.मी. पैकी तसेच तळेगाव ते कलमट आणि कलमट ते झाराप या ४3 किमी मध्ये शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. अर्थात सिंधुदर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण पूर्ण झाले असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील चौपदरीकरण रखडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण मुदतीमध्ये पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डिसेंबर २०२३ची मुदत असून मुदतीपूर्वी चौपदरीकरण पूर्ण होते की नाही याबाबत मात्र जनसामान्यांतून शंका उपस्थित होत आहे.

दरम्यान, महामार्ग वाहतूकयोग्य ठेवणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असताना मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय झाला आहे. त्याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे

राष्ट्राय महामार्ग विभागावर उच्च न्यायालय नाराज : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उदासीन व बेजबाबदार भूमिका घेत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. पायाभूत विकास प्रकल्प महाराष्ट्रात आणि त्याच्या कामाचा मनाई आदेश होतो दिल्लीत, हे योग्य नसून राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुधारित कायद्याची माहिती घेतली पाहिजे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वकिलांनी याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाला माहिती दिली नाही. या भूमिकेबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती माधव जामदार या खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग विभागाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:15 PM 12/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here