जिल्ह्याच्या विकासाकरीता सकारात्मक भूमिका : आमदार भास्कर जाधव

0

रत्नागिरी : जिल्ह्याच्या विकासकामाकरिता आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र पालकमंत्र्यांच्या नावाने कोणी फिरेल आणि कामाच्या याद्या मागेल. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशातून संघर्ष उभा राहिल असा सूचक इशारा आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत दिला.

प्रदीर्घ काळानंतर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नवनिर्वाचित पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र या बैठकीवेळी अनेक विषय कळीचा मुद्दा ठरणार होते. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या चतुराईने नियोजन मंडळाच्या सभेत सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन चुकीचे पायंडे पाडले जाणार नाहीत असा शब्द दिल्याने विकासकामाकरिता आम्ही सर्वांनी सकारात्मक राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे आम. भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या नावाने जो काही प्रकार सुरू आहे त्याची वस्तूस्थिती मी नियोजन मंडळाच्या बैठकीत मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी मी असे काही करणार नाही. आमदार, खासदार यांच्याच याद्या मंजूर होतील असा शब्द दिल्याचे आम. भास्कर जाधव यांनी सांगितले.

या नियोजन मंडळाच्या बैठकीत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम. योगेश कदम हे वारंवार करीत होते. नाईलाजास्तव आम्हाला तोंड उघडावे लागले. केवळ वैभव खेडेकर म्हणून गुन्हा दाखल होणार असेल तर ते चुकीचे आहे. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की, आमदार कदम व संबंधित विभागाचे सचिव यांच्याशी बैठक झाली आहे. बैठकीत सचिवांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून माझ्यासह खा. सुनिल तटकरे व इतर सर्वच सदस्य आक्रमक झाले.

एखादे काम मंजूर होते त्यावेळी त्याची पडताळणी ही प्रशासकीय स्तरावरून होते. मग प्रशासकीय स्तरावरून मंजुरी दिल्यानंतर एखादे काम बोगस ठरवायचे, हे चुकीचे असून गुन्हे दाखल करायचे असतील सरसकट करा. प्रशासकीय यंत्रणांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आपण लावून धरल्याचे आम. भास्कर जाधव यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना सोडून गेलेल्या ४० आमदारांवरदेखील टीकास्त्र सोडले. या ४० आमदारांनी विश्‍वासघात करून सरकार पाडलं. आता त्यानंतर राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू झाली आहे. त्याचा शुभारंभ ठाण्यातून झाला. ठाण्यात उदंड प्रतिसाद मिळाला. जे ४० आमदार गेले त्यांना वाटत होतं ४० गेले म्हणजे शिवसेनाही गेले. मात्र गद्दारी करून गेलेल्यांसोबत गेले ती सूज होती. आम्हाला थांबवण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. मात्र त्याला मी फारसे महत्व देत नाही असे आम. भास्कर जाधव यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 15/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here