राजापूर : ‘राजापूर, लांजा, साखरपा या माझ्या मतदारसंघात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे मतदारसंघ ‘ग्रीन झोन’ मध्ये ठेवण्यात तीनही तालुक्यांतील प्रशासनाचा सिंहाचा वाटा आहे’, असे कौतुकोद्गार रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत आमदार राजन साळवी काढले. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री अॅड. परब यांनी मतदासंघानिहाय आमदारांकडे कोरोना विषाणूची परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी राजापूरचे आमदार साळवी म्हणाले की, माझ्या मतदारसंघात कोरोनाचा संशयित एकही रुग्ण नाही. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांमध्ये कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. यासाठी माझ्या मतदारसंघातील आरोग्य विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, महसूल प्रशासनाचे तहसीलदार, तलाठी व कर्मचारी, पोलिस प्रशासनाचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी, लांजा न.पं. व राजापूर न.प.चे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह शिक्षक, विविध सामाजिक संस्था, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसुरक्षा दल, सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी एकजुटीने कोरोना विरोधी लढाईत काम करीत आहेत. माझ्या मतदारसंघाला ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात व लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यात या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. या बैठकीला आ. भास्कर जाधव, शेखर निकम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:59 PM 23-Apr-20
