रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील अंगणवाडयाही डिजिटल बनविण्याचा निर्णय जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. अंगणवाडीतील मुलांना स्मार्ट टीव्हीद्वारे शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १६४ आदर्श अंगणवाडींना बत्तीस इंची टीव्ही दिला जाणार आहे. चलतचित्राच्या माध्यमातून दाखविण्यात येणाऱ्या गोष्टींचे मुलांना लवकरात लवकर आकलन होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात डिजिटल साधनांच्या वापराला मोठ्याप्रमाणात महत्त्व दिले जात आहे. जिल्हा परिषद शाळा डिजिटल बनविण्यासाठी लोकसहभागातून निधी गोळा केला जात आहे. त्याच धर्तीवर अंगणवाड्याही डिजिटल करण्याचा चंग महिला व बालकल्याण विभागाने बांधला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून एकवीस लाख रुपये आणि खनिकर्मच्या निधीतून ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे. फंडातील निधीतून १११ तर ५३ दूरसंच खनिकर्मच्या निधीमधून खरेदी करण्यात येणार आहेत. आदर्श कामकाज चालविणाऱ्या अंगणवाड्यांना या दूरसंचाचे वाटप होणार आहे. दूरसंच अत्याधुनिक बनावटीचा असेल याकडे लक्ष दिले आहे. बत्तीस इंची स्मार्ट टीव्ही खरेदी केले जाणार आहे. मोबाईल जोडूनही त्याद्वारे अंगणवाडी सेविकांना शिक्षण देता येईल यावर भर दिला आहे. अभ्यासाबाबतचे अनेक प्रोग्राम पाहण्यासाठी सेविका, मदतनीस यांना टीव्हीचा वापर करता येईल. त्यामुळे अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत.
