अनुबंध संस्थेतर्फे चिपळूणमधील ‘जिनियस’ विद्यार्थ्यांचा गौरव

0

रत्नागिरी : ‘काहीतरी चांगलं आणि काहीतरी वेगळं..’ असे ब्रीदवाक्य ठेवून कार्य करणाऱ्या चिपळूण येथील अनुबंध संस्थेने शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात ‘अभ्यासापलीकडील जिनियस’ विद्यार्थ्यांचा मेळा भरवला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या अनोख्या कार्यक्रमात खेळ, वक्तृत्व, अभिनय, चित्रकला, गायन वादन, नृत्यकला, पाककला, योगासने, वाचन, लेखन, रांगोळी, सायकलिंग, पोहणे, दोरी उड्या, नेतृत्व कला, कपडे शिलाई, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, बैलगाडी शर्यत, पोवाडे, हरिपाठ गायन, सामाजिक कार्य अशी विविधांगी जीवन कौशल्य आणि कलागुण असलेल्या शहर व परिसरातील विविध शाळांनी निवडून दिलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. गर्ग म्हणाले, सध्या विविध क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू आहे. अभ्यासापलीकडचे जिनियस हा अनुबंधचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून तो समाजाला दिशा देणारा अनुकरणीय विचार आहे.

(कै.) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि ज्येष्ठ विचारवंत रवींद्र साठे यांनी सांगितले की, एज्युकेशन म्हणजे शिक्षण नसून जीवन जगण्याचा अर्थ सांगणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. म्हाळगी प्रबोधिनीचे कार्य आणि त्यातील विविध उपक्रमांची ही त्यांनी माहिती दिली. अनुबंधचे अध्यक्ष योगेश भागवत यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद केला. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, डॉ. यतीन अवताडे, शिल्पा तांबे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here