रत्नागिरी : सहा महिन्याच्या बाळाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह … आता आपली जबाबदारी वाढली रत्नागिरी वासियांनी असेच सहकार्य ३ मे पर्यंत करावे – उदय सामंत
रत्नागिरीत सापडलेल्या सहा कोरोनाबाधीत रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर चारजणांचे अहवाल आधीच निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील सर्वात शेवटचा कोरोना रुग्ण असलेल्या एका सहा महिन्याच्या बाळाचा अहवालही आता निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या घडीला रत्नागिरीत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही अशी स्थिती आली आहे. १९ मार्चला रत्नागिरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून एकूण सहाजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील शृंगारतळीचा पहिला रुग्ण, राजीवडा येथील दुसरा रुग्ण पूर्ण बरे झाले. रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एक सहा महिन्याचे बाळ कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील दोन महिलांचे अहवाल मंगळवारी निगेटीव्ह आले. सहा महिन्याच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. या अहवालातून त्याला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
मिरज येथे पाठविण्यात आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल जिल्ह्यात प्राप्त होत आहेत. रात्री उशिरा सोळा जणांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.
