कोकेन तस्करीप्रकरणी पकडलेल्या तीन आरोपींचा कसून तपास सुरू असून लवकरच यातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार आहे. त्यासाठी रत्नागिरी पोलिसांच्या पथकाने पावले उचलली आहेत. पोलिसांची पथके त्यासाठी जिल्ह्याबाहेर विविध ठिकाणी रवाना होणार आहेत.
रत्नागिरीतील एमआयडीसीत तीन तस्करांकडे सापडलेल्या कोकेनच्या तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. यातील आणखी मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. अटक केलेले तिघेजण कोकेन तस्करी करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असावेत, असाही पोलिसांचा अंदाज असून त्या दिशेने तपास सुरू आहे. न्यायालयाने तपासासाठी आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. कोकेन राजस्थान व हरियाणा येथून आणल्याचे आरोपींकडून सांगितले जात असून, त्याअनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा ठेवली आहे.
शनिवारी दुपारी रत्नागिरी एमआयडीसीतील एका पडक्या इमारतीत तब्बल 936 ग्रॅमचे कोकेन दिनेश शुभेसिंह (23, रा. हरियाणा), सुनील रणवा (26, रा. राजस्थान, सध्या रा. कारवांचीवाडी), रामचंद्र मलिक (51, रा. हरियाणा, सध्या रा. नाचणे) यांना 50 लाख रुपये किमतीच्या कोकेनसह पकडण्यात आले होते. गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेसह ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली होती.