मोडीदर्पण आणि कोकण मिडिया दिवाळी अंकांचे उद्या मुंबईत प्रकाशन

0

रत्नागिरी : मुंबईतील मोडीलिपी मित्रमंडळाचा मोडीदर्पण आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबईत गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) होणार आहे. या समारंभात ‘सुलेखन’कार अच्युत पालव यांना अक्षररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर आणि ज्येष्ठ लेखक-प्रकाशक रामदास भटकळ यांच्या हस्ते प्रकाशन आणि सत्कार समारंभ होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजलिपी म्हणून मान्यता असलेल्या मोडी लिपीसह समृद्धसुंदर कोकणचा इतिहास, संस्कृती, पर्यटनाचा विकास व्हावा, या हेतूने मोडीलिपी मित्रमंडळ मुंबई आणि साप्ताहिक कोकण मीडियातर्फे दिवाळी अंकांचे प्रकाशन केले जाते. यावर्षीच्या अंकांचे प्रकाशन २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथे रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमधअये मिनी थिएटरमध्ये प्रकाशन समारंभ होणार आहे. शिवकाळातील मोडी लिपीतील वळणदार अक्षरांचा बेमालुम उपयोग करून देवनागरी अक्षरांचे सौंदर्य वाढवून मराठीचा डंका जगभर पसरविण्याचे काम करणारे सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना अक्षररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ-लेखक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर उपस्थित राहणार असून ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, गांधी अभ्यासक रामदास भटकळ समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

कोणी बोलत असताना ते भराभर टिपून घेता येण्याच्या दृष्टीने शॉर्टहॅण्डचा शोध पाश्चात्त्यांनी लावला. परंतु त्याच्या कितीतरी शतके आधीपासूनच महाराष्ट्रातील लिहिण्याशी संबंधित असणाऱ्यांना भराभर लिहून घेण्याची युक्ती ठाऊक होती. त्यासाठी ते ‘मोडी लिपी’चा वापर करत. स्वातंत्र्यपूर्व काळात ही लिपी शालेय अभ्यासक्रमातदेखील समाविष्ट होती. आज मात्र मोडी म्हणजे इस्टेटीची जुनी कागदपत्रे कुणाच्या नावावर आहेत ते सांगणारी लिपी, एवढाच संकुचित अर्थ उरला आहे. मराठी भाषेचा हा ठेवा जतन करण्यासाठी जी काही मोजकी माणसे आणि संस्था झटत असतात, त्यांच्या प्रयत्नांना मिळालेले मूर्त रूप म्हणता येईल असा ‘मोडीदर्पण’ नावाचा दिवाळी अंक गेली अनेक वर्षे प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील सुभाष लाड यांच्या पुढाकाराने सुरू असून विजय हटकर हे त्याचे कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यंदाचा अंक शिवकाळातील वाङ्मय आणि कोकणातील ऐतिहासिक बंदरे या विषयावर वाहिलेला आहे.

कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव हे कोकण मीडिया या साप्ताहिकाच्या सातव्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. देवभूमी कोकणातील प्रत्येक मंदिर महत्त्वपूर्ण असून या मंदिराचे होणारे वार्षिक पारंपरिक उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतात. कोकणातील या उत्सवांचा वेध दिवाळी अंकात घेण्यात आला आहे.

मराठी भाषा, ती आणि दिवाळी अंकांची शतकोत्तर परंपरा जपणारे दिवाळी अंक आणि सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here