रत्नागिरी : राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे पंचायत समिती सभापती विभांजली पाटील यांच्यासोबत झालेल्या यशस्वी चर्चेनुसार रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार ७ ऑगस्टला जमा झाले आहेत. त्यामुळे शिक्षक समितीने नियोजित आंदोलन स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांचे पगार १० ऑगस्टपर्यंत न झाल्यास १३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असे पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. या पत्राची दखल सभापती विभांजली पाटील, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांनी तात्काळ घेत २ ऑगस्टला बैठक झाली. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी सभेत अतिशय बारकाईने चर्चा होऊन अनेक प्रश्नांबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. त्यानुसार आज जुलै महाचे पगार जमा झाले आहेत. चटोपाध्याय तसेच निवड श्रेणी फरकांची बिले गणपती सुट्टीत पात्र शिक्षकांना मिळणार, प्रलंबित मंजूर वैद्यकीय बिले या महिन्यात शिक्षकांना मिळणार, नवीन पेन्शन योजनेतील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील ३६ महिन्याच्या फरकांपैकी पहिला हफ्ता स्वतंत्र बिल तयार करून गणपती सुट्टीत देणार, शिक्षकांचे पगारतक्ते पीडीएफ स्वरूपात मिळणार, ज्या शिक्षकांचे ६ व्या वेतन आयोगातील फरकाचे हफ्ते भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा नाहीत त्यांचे हफ्ते भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करणे याबाबत कार्यवाही सुरु आहे.
