शृंगारतळी येथील जीवनज्योती मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारले आकाश कंदिल

0

पाटपन्हाळे : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील ग्रामआधार स्वयंसेवी संस्थेच्या जीवनज्योती मतिमंद मुलांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांनी हस्तकौशल्यातून साकारलेले आकाश कंदील संपूर्ण गुहागर तालुक्यात लक्षवेधी ठरत असून या विद्यार्थ्यांनी एक पाऊल पुढे टाकत दिवाळीसाठी बनविलेले आकाश कंदिल त्यांना प्रेरणा देणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाअध्यक्ष विनोद जानवळकर, बोरगावचे सरपंच सुनिल हळदणकर, राहुल जाधव यांनी या शाळेला भेट देऊन मतिमंद मुलांच्या हस्तकौशल्यातून बनविलेल्या आकाश कंदिल खरेदीसाठी पुढाकार घेतला. तसेच मतिमंद मुलांच्या शाळेसाठी पुढील काळात जे सहकार्य लागेल ते देण्याचे आश्वासन दिले. मतिमंद मुलांकडे समाजाचे दुर्लक्ष होत असते, मतिमंद मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे, मतिमंद मुलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी ग्रामआधार स्वयंसेवी संस्था शृंगारतळी ही सतत प्रयत्न करत आहे.

मतिमंद मुलांना सन्मानाने जगता यावे यासाठी विद्यार्थ्यांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश कंदिलला संपूर्ण तालुक्यात विशेष मागणी होवू लागली आणि कौतुकही होवू लागले. परंतु विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न असल्याने जास्तीचे आकाश कंदिल लोकांना उपलब्ध होऊ शकले नाहीत. यावेळी बोलताना मनसे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, मतिमंद मुलांसाठी येथील ग्रामआधार स्वयंसेवी संस्था व सर्व शिक्षक या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत आहेत त्यांना विद्यार्थ्यांचे पालकही सहकार्य करत आहेत. परंतु या मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येवून हातभार लावणे गरजेचे आहे. तालुकाभरातून गरीब पालक देखील आपल्या मतिमंद मुलांना शिक्षणासाठी घेऊन येत असतात. परंतु त्यांना वाहतूकीचा खर्च परवडत नाही. असेही काही विद्यार्थी याठिकाणी आहेत. तसेच या शाळेला कोणतेही शासनाचे अनुदान मिळत नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेचे भाडेही न परवडणारे आहे. तरी येथील लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी या शाळेला अनुदान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या मतिमंद शाळेतील मुलांना सहकार्य करण्याची आज गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here