सणासुदीला प्रवाशांची लुट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाईचे आश्वासन

0

रत्नागिरी : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून गणपती, दिवाळी सणासुदीला प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लूटमार केली जाते.

सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लूटमार थांबवण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळामध्ये अॅड. किशोरी कुलकर्णी, भगवा गार्डचे राष्ट्रीय समन्वयक अवधूत वसंत, नॅशनल प्रोग्रेस यूथ असोसिएशनचे रोहिदास शेडगे आणि सुराज्य अभियानाचे अभिषेक मुरुकट उपस्थित होते. हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियनांतर्गत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांची आर्थिक लूटमार थांबावी यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंग सेंटरवर शासनमान्य तिकिटदर लावण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ ला दिले होते; परंतु राज्यातील बहुतांश ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंग सेंटरवर अद्यापही शासनमान्य तिकिटदर लावलेले नाहीत. योग्य पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील १६ ठिकाणी प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदने दिली.

मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रवाशांना तक्रारीसाठी दिलेली लिंक उघडत नसल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. ती दुरुस्त करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. तक्रारीसाठी दिलेल्या दूरध्वनीवर कोणी उचलत नसल्याचे सांगितले. त्यावर व्हॉटस्‌ अॅपवर तक्रार नोंदवण्याची सुविधा निर्माण करू, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले. शिष्टमंडळाने नोंदवलेल्या तक्रारींवर उपाययोजना काढण्याविषयी मासिक बैठकीमध्ये सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना करू, असेही आयुक्तांनी सांगितले. ऑनलाईन भरमसाट दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी सक्षम कायदा नसल्यास त्यासाठीचे ठोस धोरण परिवहन विभागाने निश्चित करायला हवे. परिवहन विभागाकडून ठोस कारवाई झाली नाही तर नागरिकांच्या हितासाठी आम्हाला न्यायालयीन कारवाईचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशाराही सुराज्य अभियानाच्या वतीने दिला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:02 PM 21/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here