नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. कलम ३७० रद्द केल्याचा राग मनात धरून पाकने समझौता एक्स्प्रेस वाघा सीमेवरच आज, गुरुवारी रोखली. सुत्रांच्या माहितीनुसार, आज पाकिस्तानमधून समझौता एक्स्प्रेस भारतात येत होती. वाघा सीमेवर समझोता एक्स्प्रेस आल्यानंतर ती पाकिस्तानकडून थांबविण्यात आली. पाककडून आदेश आल्यानंतर समझोता एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने वाघा सीमेवर गाडी थांबवली आणि सुरक्षेच्या कारणामुळे ही गाडी अटारीला जाणार नाही असे जाहीर केले. पाकच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासी सीमेवरच अडकले आहेत. ‘आमचे गार्ड आणि ड्रायव्हर भारताच्या सीमेत प्रवेश करणार नाहीत’, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली असून भारतानेच आता त्यांचे गार्ड आणि ड्रायव्हर पाठवावेत, असेही पाकने म्हटले आहे. यानंतर भारताकडून आपले गार्ड आणि ड्रायव्हर पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. गाडीच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही असे भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाने गाडीच्या ड्रायव्हरला कळवले. मात्र, पाकिस्तानकडून तसे आदेश आल्याखेरीज आपण गाडी पुढे नेणार नाही, अशी भूमिका ड्रायव्हरने घेतली. समझौता एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस दिल्ली आणि अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत धावते. लाहोरहून ती सोमवार आणि गुरुवारी निघते.
