राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १९ परिचारिकांच्या नोकऱ्या संपुष्टात

0

रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नेमलेल्या राज्यातील ५९७ परिचारिकांच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरपासून त्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १९ परिचारिकांचा समावेश आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या बिगरआदिवासी क्षेत्रात ३२०७ एएनएम पदे २०२२-२३ मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. त्याबाबतचा महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्त स्तरावरून तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणीचा आराखडा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला होता. त्यातील २ हजार ६१० पदांना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार नर्सेसना आरोग्य विभागाकडून नियुक्त्याही देण्यात आल्या.

दरम्यान, मागील वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिकापदे रद्द करावीत. ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे. ज्यांची सेवा कमी झाली आहे (सेवाज्येष्ठतेनुसार) त्यांना कमी करावे, असे नव्या आदेशात म्हटले आहे.

मागील वर्षीही परिचारिका सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली होती; परंतु अचानक दिलेले आदेश रद्द करून त्यांची सेवा समाप्त करू नये, असे नव्याने आदेश काढण्यात आले होते; पण आता यावर्षी केंद्राकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ५९७ परिचारिकांची नोकरी ३१ ऑक्टोबरपासून समाप्तीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here