नवी दिल्ली : जगभरासह भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या घरात गेला आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग देखील मंदावला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते आता दहा दिवसांवर गेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भारतातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केला आहे.
