नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

0

रत्नागिरी : खान्देश, विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी आता ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान ही गाडी सध्या हंगामी स्वरूपात धावत आहे.

विदर्भ, खान्देशातून कोकणात थेट येण्यासाठी रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सव आणि दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव गोवा (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी ऑक्टोबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३१ डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून दोनदा नागपूर जंक्शन येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगाव गोवाला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. मडगावहून ही गाडी (क्र. ०११४०) गुरुवार तसेच रविवारी रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता नागपूर जंक्शनला पोहोचेल.
या प्रवासात ही गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवी तसेच करमळी येथे थांबणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ३८ फेऱ्या होणार आहेत. या गाडीचे संगणकीय आरक्षण ऑनलाइन तसेच आरक्षण खिडकीवर सुरू आहे.

नागपूर मडगाव गोवा प्रतीक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनाचे अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. शबनम शेख, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगावकर, राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत, दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर, मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी तसेच नियमित प्रवाशांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:17 PM 24/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here