चिपळूणच्या तोरणांनी वाढवली राजभवनाची शोभा

0

रत्नागिरी : कोकणाच्या मातीतच कलागुणांचे बीज आहे. आणि यां कलागुणांना वाव मिळाल्यावर तुझी झळाली काही औरच असते. असंच कौतुक चिपळूण तालुक्यातील तळवडे येथील महिला बचतगटाच्या महिलांचे थेट राज्यपालांनीच केले असून यां महिलांनी खणापासून तयार केलेली तोरणे थेट राज दरबाराची शोभा वाढवित आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहाशे तोरणांची ऑर्डर देऊन महिला बचतगटांच्या या उद्योगशीलतेला प्रेरणा दिल्याने हा गट राज्यस्तरावर पोहोचला आहे.

तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तळवडे येथील आदर्श स्वयंसहाय्यता बचतगटाने ही तोरणे केली आहेत. जिल्हास्तरावर महिला बचतगटांच्या उत्पादीत होणार्‍या मालाचे एक बूकलेट तयार करण्यात आले होते. जिल्हाभरातील महिला बचत गटांनी एकत्र येत विविध व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांना रोजगाराचे साधन मिळावे, आर्थिक उत्पन्‍न मिळावे यासाठी गावागावात अनेक बचतगट तयार झाले आहेत. त्यातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. या प्रमाणेच तळवडे येथील आदर्श स्वयंसहाय्यता समुहाची स्थापना जानेवारी 2022 मध्ये झाली. मात्र, एवढ्या अल्प कालावधीत या बचत गटाने तयार केलेली तोरणे थेट राजभवनाची शोभा वाढवित आहेत.

जि. प.च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प अधिकारी एन. बी. घाणेकर आणि उमेद अधिकार्‍यांच्या माध्यमातून महिला बचतगटांना बाजारपेठ मिळावी यासाठी बूकलेट तयार केले होते. हे बूकलेट अधिकारी तसेच मंत्रालय स्तरावर वितरित करण्यात आले. उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर व मुख्य परिचलन अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी बूकलेटच्या पाहणीनंतर राज्यपाल कोश्यारी यांना खणांच्या तोरणांची माहिती दिली. त्यानंतर या बचत गटाची सहा ते सात तोरणे राजभवनात नमुना म्हणून पाठविण्यात आली. ही तोरणे राज्यपालांच्या पसंतीस आल्याने पहिल्या टप्प्यात दोनशे तोरणांचा पुरवठा या बचत गटाने केला. त्यानंतर पुन्हा चारशे तोरणांची ऑर्डर मिळाल्याने सलग तीन दिवस वीस तास काम करून तोरणे तयार करण्यात आली व तत्काळ राजभवनावर पाठविण्यात आली.

कोकरे प्रभागाचे समन्वयक शुभम जाधव यांनी यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहा-दहा महिलांनी काम करीत सहाशे तोरणे तयार केली. चार ते पाच प्रकारच्या खणांची ही तोरणे असून शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून त्याची निर्मिती झाली आहे. या कामासाठी जि.प. चे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक अमोल काटकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी देखील अत्यंत कमी वेळेत तोरणे तयार करून राजभवनावर पाठवली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:37 PM 26/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here