टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, नेदरलँड्सवर साकारला दणदणीत विजय

0

सिडनी : विश्वचषक जिंकण्यासाठी भारताने आपले दुसरे ठोस पाऊल टाकले आहे. पहिल्या सामन्यात भारताला अखेरच्या षटकावर पाकिस्तानवर विजय मिळवता आला होता. पण या दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय संघाने दणदणीत विजय साकारला आणि मिशन वर्ल्डकपमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताने यावेळी ५६ धावांनी दणदणीत विजय साकारला.

भारताच्या तीन फलंदाजांकडून यावेळी अर्धशतकं पाहण्याचा योग चाहत्यांना मिळाला. रोहितने जबरदस्त संघाला सुरुवात करून दिली आणि आपले आपेल अर्धशतक साकारले. पण रोहित बाद झाल्यावर कोहलीने धडाकेबाज फटकेबाजी केली. कोहलीला यावेळी सूर्यकुमार यादवची चांगली साथ मिळाली. कोहलीने यावेळी सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. त्यानंतर सूर्यानेही आपले अर्धशतक अखेरच्या चेंडूवर साजरे केले. त्यामुळे भारताला नेदरलँड्सपुढे १८० धावांचे आव्हान ठेवता आले. भारताने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला तरी लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. पहिल्या सामन्यातही राहुल लवकर बाद झाला होता. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तो मोठी खेळी साकारतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण राहुल यावेळी पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला ९ धावांवर समाधान मानावे लागले. पण रोहितने त्यानंतर ५३ धावांची खेळी साकारली.

रोहित यावेळी ५३ धावांवर बाद झाला खरा, पण त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली भागीदारी झाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. कोहलीने यावेळी ४४ चेंडूंत नाबा ६२ धावांची खेळी साकारली. पण त्याच्यापेक्षा आक्रमक खेळी ही सूर्याकडून पाहायला मिळाली. कारण सूर्याने तुफानी फटकेबाजी करत फक्त २५ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५१ धावांची खेळी साकारली. अखेरच्या चेंडूवर सूर्याने आपले अर्धशतक साजरे केले.

भारताने यावेळी नेदरलँड्सपुढे १८० धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. हे आव्हान पाहूनच त्यांचे अवसान गळून पडले होते. पण दुसरीकडे भारताच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच भारताला यावेळी दणदणीत विजय साकारता आला. भारताचा हा विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. यापूर्वी भारताने पहिला विजय पाकिस्तानच्या सामन्यात मिळवला होता. आता हा दुसरा विजय साकारत त्यांनी स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे आणि एकही पराभव त्यांना पत्करावा लागलेला नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 27/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here