वहाळमध्ये रंगणार चतुरंगची ‘दिवाळी पहाट मैफल’ !

0

रत्नागिरी : आपल्या विविध सांस्कृतिक -शैक्षणिक उपक्रमांतून अनेक नामवंत कलाकारांना कोकणासारख्या दुर्गम आडमार्गी भागात आणण्याचे आणि त्यांच्या कलाविष्कारांचा आस्वाद कोकणातील रसिकांना मिळवून देण्याचे श्रेय नि:संदीग्धपणे ‘चतुरंग प्रतिष्ठान’ला द्यावे लागेल.

गेल्या २५ वर्षात ‘कलासंध्या’ ‘आस्वादयात्रा’, ‘मुक्तसंध्या’, ‘दिवाळी पहाट’ यांसारख्या लक्षवेधी उपक्रमांद्वारे चिपळूण-रत्नागिरी-गोव्यामध्ये हजेरी लावलेल्या कलाकारांची संख्या दोन-अडीचशेंचा उंबरठा ओलांडून पुढे गेलेली आढळते. कोरोनाचा अंधार ओसरल्यावर यावर्षीची ‘दिवाळी पहाट मैफल’ चिपळूण जवळच्या वहाळ या निसर्गरम्य कोकणखेड्यात होत आहे.

‘दिवाळी पहाट’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची मूळ संकल्पना चतुरंग प्रतिष्ठानची स्वतःची असून, चतुरंगनेच ती १९८६ साली मुंबईत सर्वप्रथम अंमलात आणली. विशेष म्हणजे गेल्या ३६ वर्षांत मुंबई-ठाणे-पुणे -चिपळूण-वहाळ-गुणदे-रत्नागिरी-गोवा असा प्रवास करत करत गतवर्षी सुवर्णमहोत्सवी दिवाळी पहाट साकार केली. अर्थात ही अफलातून संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना प्रतिवर्षी आकाशकंदील.. रांगोळ्या.. पणत्या.. सुगंधी स्वागत.. एखाद्या संस्थेला भाऊबीजभेट.. सर्व रसिकांना फराळ.. आणि संगीत मैफल.. या आपल्या सप्तवैशिष्ट्यांनिशीच ५० ‘दिवाळी पहाट’ साकार करून सर्वदूर महाराष्ट्राला जणूं सांगितिक मेजवानीच दिली आहे.यावर्षी चतुरंगने जाणीवपूर्वक कोकणातील लोकप्रिय कलाकारांना प्राधान्य दिले असून वहाळमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सूर प्रभाती, रंगती..!’ या मैफलीत कोकणातील रसिकमान्य गायक श्री.अजिंक्य पोंक्षे आणि सौ.श्वेता तांबे -जोगळेकर यांच्या नाट्यगीत, भावगीत, भक्तीगीत, अभंग अशा संमिश्र सुश्राव्य जोडगायनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या मैफलीला तबलासाथ श्री. हेरंब जोगळेकर आणि हार्मोनियमसाथ श्री. चैतन्य पटवर्धन हे वादक कलाकार करणार असून निवेदन श्री. निबंध कानिटकर करणार आहेत.चतुरंगच्या ‘निवासी अभ्यासवर्ग’ या पालक-विद्यार्थीप्रिय अशा शैक्षणिक उपक्रमात यंदा एक विशेष भाग म्हणून रंगणारी ही जुगलबंदी मैफल रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.१५ वाजता न्यू स्कूल वहाळ शाळेतील सभागृहात पार पडणार आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असलेल्या या मैफिलीचा लाभ उत्सुक रसिकश्रोत्यांनी अवश्य घ्यावा असे आवाहन चतुरंगने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 28/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here