खेड : खेडवासीयांना बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडाटात आणि सोसाट्याचा वारा यासह बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा तालुक्यातील मुरडे गावाला चांगलात फटका बसला. या गावातील सुमारे 50 घरांचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील असगणी येथेही एका घरावर वीज कोसळल्याने घरासह विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महामार्ग चौदपरीकरणासाठी खोदलेली माती रस्त्यावर आल्याने महामार्गावर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांची वाहतुक ठप्प झाली. बुधवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळाचा फटका खेड शहरालाही बसला, खेड एसटी स्थानकाच्या शेजारी असलेल्या अंगण हॉटेल समोरील नारळाचे झाड जमीनदोस्त झाले तर याच परिसरातील आकांक्षा इमारती समोरील आंब्याचे झाड दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसुल खात्याकडून सुरु करण्यात आले आहेत.
