दिवाळी फराळ स्नेहमिलनानिमित्त महाविकास आघाडीचे नेते एकत्र

0

रत्नागिरी : दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित केलेल्या फराळ स्नेहमिलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार राजन साळवी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनीही हजेरी लावली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी फराळ स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आ. राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्यासह काँग्रेसच्या महिला नेत्या अ‍ॅड. अश्विनी आगाशे, रूपाली सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला सेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसच्या महिला नेत्या उपस्थित राहिल्याने आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी निश्चित मानली जात आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीने आपल्या स्थानिक पदाधिकार्‍यांनाही निमंत्रित केले होते. यातून राष्ट्रवादीचे पक्ष संघटनही मजबूत करण्यास हातभार लागला.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आठ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे संघटन काहीसे डळमळीत झाले. राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, मिलिंद कीर, नीलेश भोसले यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड कायम ठेवली. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी शिवसेना दुभंगल्यानंतर ना. सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मूळच्या शिवसेनेत पडझड झाल्याचे चित्र आहे. या राजकीय घडामोडींमुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली होती.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमाला शिवसेनेसह काँग्रेसच्या नेत्यांनीही उपस्थिती लावल्याने आता महाविकास आघाडी होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर, राजन सुर्वे यांनीही यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांसोबत फराळाचा आस्वाद घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 31/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here